नांदेड, १९ मे (प्रतिनिधी माधव वाघमारे)
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत मनाटा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका 22 वर्षीय तरुणाकडून अग्निशस्त्रासारखे दिसणारे पिस्तुल लाइटर जप्त केले. ही कारवाई शिबदरा येथील नवी अबादी परिसरात करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 18 मे 2026 रोजी पोलिस पथक पेट्रोलिंगवर असताना गोपनीय खबर मिळाली की, नवी अबादी शिबदरा येथे एक व्यक्तीकडे अग्निशस्त्र आहे. यावरून पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून संशयित तुषार अरविंद वाघमारे (वय 22, बेकार, रा. नवी अबादी शिबदरा, ता. हदगांव, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक सिल्वर-ब्लॅक रंगाचे JC XIN.SHI.JIMADE IN.JIANCHEN MADE IN CHINA या कंपनीचे अग्निशस्त्र सदृश पिस्तुल लाइटर (बंदुक) आढळून आले. हे लाइटर जुने वापरलेले असून त्याची किंमत अंदाजे 1,500 रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दोन पंचांच्या साक्षीने हा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 6/28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 76/2026 असून तो मनाटा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक अचना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दगडू हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास सुदामराव चवळी, पोहेकॉ अशोक दाढे, रेणुप्प्रसाद भोपाळकर, बालाजी रावले, शंकर सोनटक्के, शामराव खनपटे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ बालाजी रावले करत आहेत.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.












