नांदेड १६ जुलै ( प्रतिनिधी, माधव वाघमारे)
सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) संवर्गाबाबत अत्यंत बेजबाबदार, अपमानकारक, अश्लील व चिथावणीखोर वक्तव्य करून संपूर्ण संवर्गाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या रविराज साबळे (उर्फ आण्णासाहेब शेषनाथ साबळे, मु. तितरज, पो. अंतरवाली ता. भूम जि. धाराशिव) याच्याविरुद्ध पोलीस गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (डीएनएफई १३६), तालुका शाखा मुदखेडच्या वतीने आज पंचायत समिती नांदेड बीडीओ साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, रविराज साबळे याने एका व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व २८,००० ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार होतो, असा कोणतीही शहानिशा व पुरावा न देता सरसकट आरोप केला आहे. तसेच ‘ग्रामसेवक’ पदनाम बदलून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ केले, पण ‘सेवक बनायचीही लायकी नाही’, ‘सर्वांची मुले तुळजापूरला बसतील’, ‘हरामखोर’ अशा स्वरूपाचे अत्यंत अशोभनीय, शापवजा व शिवीगाळ करणारे शब्द वापरले आहेत. या चिथावणीखोर वक्तव्यामुळे राज्यातील हजारो प्रामाणिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का पोहोचला असून संपूर्ण संवर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
अशा प्रकारच्या बिनबुडाच्या वक्तव्यांमुळे समाजात शासन यंत्रणेबद्दल अविश्वास निर्माण होतो, तसेच ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाविषयी द्वेष व वैमनस्य वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या संबंधित व्हिडिओ व इतर डिजिटल पुराव्यांची तातडीने तपासणी करून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे लागू असलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदींनुसार रविराज साबळेविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचा बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनाची प्रत माननीय जिल्हाध्यक्ष/सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनएफई १३६, जिल्हा शाखा नांदेड यांना माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी व बहुसंख्येने ग्रामसेवक उपस्थित होते.












