नांदेड ६ जुलै प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी व्यापक ‘मास रेड’ मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने काम करत शहरी व ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर अचानक धाडी टाकल्या. यामध्ये दारूबंदी, मटका, जुगार, गुटखा विक्री तसेच गोवंश आणि रेतीची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. एकाच दिवसात ६१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७३ आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली आहे. या कारवाईदरम्यान एकूण ₹७,९९,०३०/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
कारवाईचा सविस्तर तपशील:
- दारूबंदी कारवाई: ४८ गुन्हे दाखल | ४८ आरोपी | ₹१,४५,७६०/- मुद्देमाल जप्त
- मटका / जुगार कारवाई: ०७ गुन्हे दाखल | १७ आरोपी | ₹१,१०,९४०/- मुद्देमाल जप्त
- गुटखा (BNS कलम १२३) कारवाई: ०२ गुन्हे दाखल | ०२ आरोपी | ₹१,११,३८०/- मुद्देमाल जप्त
- इतर कारवाया (गोवंश, रेती व इतर): ०४ गुन्हे दाखल | ०६ आरोपी | ₹४,३०,९५०/- मुद्देमाल जप्त
ही मोहीम पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून, सर्व अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच अवैध व्यवसायांची कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– प्रतिनिधी, माधव वाघमारे











