विशेष प्रतिनिधी ६ सप्टेंबर (माधव वाघमारे) / हिंगोली
नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने हिंगोली शहरात चालणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १८ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून २ लाख १६ हजारांच्या रोकडीसह एकूण १८ लाख ४७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिंक्य सुदामराव नागरे यांच्या कॉम्प्लेक्समधील पत्राच्या गाळ्यात अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी ‘दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट’च्या परवान्याच्या नावाखाली अजिंक्य नागरे यांच्यामार्फत ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळवला जात असल्याचे तपासात उघडकीस आले.
असा जप्त केला मुद्देमाल:
- नगदी रक्कम: २,१६,०२० रुपये
- मोबाईल: १५ स्मार्टफोन/मोबाईल
- वाहने: १ चारचाकी वाहन आणि ४ मोटारसायकली
- एकूण जप्ती: १८,४७,०२० रुपयांचा मुद्देमाल
या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६९१/२०२६ नुसार कलम ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि बनसोडे करत आहेत. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ/प्रदिप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डबरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.
‘खबर’ हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन परिक्षेत्रात कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी थेट पोलिसांना माहिती द्यावी, यासाठी विशेष ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी 91 50 100 100 या क्रमांकावर आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती बिनधास्तपणे द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.












