नांदेड: २८ मार्च
छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेले ‘सुवर्ण होन’ (सोन्याचे नाणे) आता प्रथमच नांदेडमध्ये पाहता येणार आहे. ‘नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार’ आणि ‘नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन सुवर्ण होन, प्राचीन नाणी आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण: शिवकालीन सुवर्ण होन
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळी ‘सोन्याचे होन’ हे नाणे प्रचलित केले होते. या नाण्याच्या एका बाजूवर ‘श्री राजा शिव’ आणि दुसऱ्या बाजूवर ‘छत्रपती’ असे अक्षरे कोरलेली आहेत. अत्यंत दुर्मिळ असलेले हे नाणे आजच्या घडीला जगभरात केवळ ५ ते ६ उपलब्ध आहेत. त्यापैकी एक राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली आणि दुसरे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई येथे आहे. याच दुर्मिळ वारशाची प्रचिती नांदेडकरांना या प्रदर्शनात घेता येईल.
प्रदर्शनात काय पाहायला मिळेल?
- अशोक सिंह ठाकूरजींचा संग्रह: शिवरायांच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक पुरावा असलेले सुवर्ण होन.
- चक्रधर संग्रहालय, निलंगा (लातूर): इसवी सन पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी.
- महाबली शहाजीराजे भोसले ट्रस्ट: ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टच्या संग्रहातील प्राचीन आणि धारदार युद्धकला शस्त्रे.
कार्यक्रमाचा तपशील: - दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६
- वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत
- स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड.
इतिहास प्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.












