नांदेड १५ ऑगस्ट (प्रतिनिधी: माधव वाघमारे)
भारत सरकारकडून कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२१ (शौर्य श्रेणी) या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले कंधार तालुक्यातील घोडज येथील सुपुत्र कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अतुलजी सावे साहेब यांच्याकडे शासकीय सेवेत रुजू करून घेण्याबाबत विनंती अर्ज सादर केला आहे.
लहान वयात प्राणाची बाजी लावून दाखवलेल्या धैर्याची दखल घेत केंद्र सरकारने कामेश्वर याला या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले होते. या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराची दखल घेऊन, शासन निर्णयातील तरतुदींनुसार विशेष बाब (Special Case) म्हणून महसूल विभागात किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागात ‘लिपीक-टंकलेखक’ (Clerk-Typist) किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ते समकक्ष पद देऊन शासकीय सेवेत संधी देण्यात यावी, अशी नम्र विनंती त्यांनी अर्जाद्वारे केली आहे.
शैक्षणिक व तांत्रिक पात्रता:
- शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण (सध्या B.A. ३ऱ्या वर्षात शिक्षण सुरू)
- तांत्रिक अर्हता: MS-CIT, मराठी ३० शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी ४० शब्द प्रतिमिनिट टायपिंग उत्तीर्ण
कुटुंबाला आधार व जनतेची सेवा हेच ध्येय
शासकीय सेवेत रुजू होऊन आपल्या कुटुंबाला भक्कम आधार देणे आणि गोरगरीब व गरजू जनतेची अत्यंत प्रामाणिकपणे व तत्परतेने सेवा करणे हेच आपल्या आयुष्याचे मुख्य ध्येय असल्याचे कामेश्वर वाघमारे यांनी अर्जात नमूद केले आहे.
कंधार तालुक्यातील या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या तरुणाच्या अर्जाचा पालकमंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक व सहानभूतीपूर्वक विचार करून त्याला शासकीय सेवेत संधी देऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












