मुंबई : महाराष्ट्रात भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या Special Intensive Revision (SIR) 2026 प्रक्रियेतून राज्यातील मतदार यादीबाबत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. SIR मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर राज्यातील एकूण 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदार विविध कारणांमुळे पडताळणीदरम्यान मिळू शकले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 17 लाख 66 हजार 502 दुबार मतदार, 34 लाख 82 हजार 231 मृत मतदार, तर 76 लाख 76 हजार 135 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे आढळून आले आहे. याशिवाय SIR प्रक्रियेदरम्यान 75 लाख 41 हजार 229 मतदार अनुपस्थित किंवा मिळू न शकलेले असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
प्रारूप मतदार यादीतून सर्वाधिक मतदार वगळण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे आणि ठाणे आघाडीवर आहेत. पुण्यातून 28 लाख 66 हजार 481, ठाण्यातून 28 लाख 59 हजार 377, तर मुंबई उपनगरातून 26 लाख 58 हजार 202 मतदार वगळण्यात आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधील मतदार यादीच्या पडताळणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुबार मतदारांच्या आकडेवारीतही ठाणे जिल्हा आघाडीवर असून येथे 1 लाख 53 हजार 338 दुबार नोंदी आढळल्या आहेत. त्यानंतर पुण्यात 1 लाख 43 हजार 975, नागपूरमध्ये 1 लाख 18 हजार 99, मुंबई उपनगरात 1 लाख 13 हजार 582, सोलापूरमध्ये 1 लाख 5 हजार 941, तर नाशिकमध्ये 1 लाख 3 हजार 709 दुबार मतदार आढळून आले आहेत.
SIR अंतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत नागरिकांना आपले नाव तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वेबसाइटवर जाऊन SIR Draft Roll 2026 हा पर्याय निवडून जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, भाषा आणि संबंधित यादीभाग निवडून मतदार यादीची PDF डाउनलोड करता येते. त्यामध्ये आपले नाव तपासता येणार आहे.
तसेच मतदार यादीतून आपले नाव वगळण्यात आले आहे का, हे तपासण्यासाठी ASSD LIST (Absent, Shifted, Dead, Duplicate) – SIR 2026 या पर्यायाचा वापर करता येईल. मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या माध्यमातून किंवा मतदान केंद्रनिहाय उपलब्ध यादीत नागरिकांना आपले नाव तपासता येणार आहे.
दरम्यान, प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांना 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2026 हा वय अर्हता दिनांक असून, त्या तारखेपर्यंत 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना नव्याने मतदार नोंदणीची संधी मिळणार आहे.
त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने SIR 2026 अंतर्गत आपले नाव मतदार यादीत कायम आहे की नाही, याची वेळेत पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाव वगळण्यात आले असल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास 30 सप्टेंबरपूर्वी दावा किंवा हरकत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












