नांदेड : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यासह वाहतुकीस अडथळा ठरणारे इतर अडथळे दूर करण्यात आले.
2 सप्टेंबर 2026 रोजी स्नेहनगर पोलीस वसाहत, तेराज कॉर्नर ते शंकरराव चव्हाण चौक या प्रमुख मार्गावर ही कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखा, पोलीस कर्मचारी, RCP पथक तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाईत सहभाग घेतला.
या मोहिमेत रस्त्यालगत असलेल्या टपऱ्या, हातगाड्या, फळविक्रेते तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, एकूण 68 प्रकरणांमध्ये ₹65,350 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर वाहने पार्क करू नयेत, रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये आणि विद्यार्थ्यांनी ट्रिपल सीट प्रवास करू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण व अवैध पार्किंगविरोधातील ही विशेष मोहीम यापुढेही नियमित सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.












