प्रतिनिधी: माधव वाघमारे
दिनांक ३० ऑक्टोंबर नांदेड
नांदेड जिल्ह्यात वाढत्या मंदिर चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंदिरांमधील देवांचे मुखवटे, दागिने आणि दानपेठ फोडून चोरी करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून कंदहार, हिमायतनगर, तामसा, भाग्यनगर आणि कुंटूर येथील एकूण ५ घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीঁकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ४,७४,८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा व कारवाई
दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मंदिरात चोरी करणारे रेकॉर्डवरील दोन आरोपी काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून लातूर ते नांदेड रोडने लोहाकडे येत असून, त्यांच्याकडे चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले आहेत.
सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन अहमदपूर ते नांदेड रोडवर, लांडगेवाडी जवळ दिव्या हॉटेलच्या विरुद्ध दिशेला सापळा रचला. थोड्याच वेळात वर्णनाप्रमाणे येणारी पल्सर मोटरसायकल अडवून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी त्यांची नावे १) समिर अहमद अली सय्यद (वय २५ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. बिस्ती गल्ली, अहमदपूर, जि. लातूर) आणि २) हातीक उर्फ आतिक आजम सय्यद (वय ३९ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. खाटीक गल्ली, अहमदपूर, जि. लातूर) अशी सांगितली.
खोंचल चौकशीत गुन्ह्यांची कबुली
पंचसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपी समिर याच्याकडे पांढऱ्या कॅरीबॅगमध्ये चांदीचे दागिने व खिशात रोख रक्कम आढळली, तर आरोपी हातीक याच्याकडे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी मागील नऊ महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील कंदहार, कुंटूर, हिमायतनगर, तामसा आणि नांदेड शहरातील (भाग्यनगर) मंदिरांमधील देवांचे चांदीचे मुखवटे, सोन्या-चांदीचे दागिने आणि दानपेठ फोडून चोरी केली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे व जप्त मुद्देमाल
पोलिस अभिलेखाची पाहणी केली असता खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत:
- कंदहार ३२९/२०२६ कलम ३०५(अ), ३३१(४), ३(५) बी.एन.एस.
- हिमायतनगर २३१/२०२६ कलम ३३१(४), ३०५, ३२४(४)
- तामसा ४७/२०२६ कलम ३३१(2), ३०५, ३(५) बी.एन.एस.
- भाग्यनगर ४२३/२०२६ कलम ३०५(३)
- कुंटूर १५/२०२६ कलम ३३१(४)
दोन्ही आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोटरसायकल असा एकूण ४,७४,८४५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमहालासह पोलीस स्टेशन कंदहार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मार्गदर्शक व तपास पथक
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संघरत्न गायकवाड, श्रीराम दासरे, मनोज राठोड, महेश वडगु, सुधाकर देवकत्ते तसेच सायबर सेल येथील राजेंन्द्र सिटीकर व दिपक ओढणे यांच्या पथकाने केली आहे.












